मुस्लिम युवकांना नाहक त्रास नको!

दहशतवादाच्या नावाखाली निरपराध मुस्लिम युवकांना नाहक ताब्यात घेऊ नका , असे पत्र केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवून नवा वाद निर्माण केला आहे. मुस्लिम युवकांना अयोग्य पद्धतीने अडकवून सुरक्षा यंत्रणाकडून त्रास देण्यात येत असल्याबद्दल केंद्र सरकारकडे अनेक तक्रारी येत आहेत. आपल्या मूलभूत अधिकारांवरच गदा येत असल्याची या युवकांची भावना असल्याचे शिंदेंनी पत्रात म्हटले आहे.

हे पत्र म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले मतांचे राजकारण असल्याची टीका भाजपने केली असून धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिंदे यांनी तातडीने राजीनामा द्यावा , अशी मागणी केली आहे. भाकपनेही काँग्रेसवर मुस्लिम अनुनयाचा आरोप केला आहे. शिंदेंनी मात्र भाजपची राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे. तसेच काँग्रेसने शिंदेंची पाठराखण केली आहे.