Free Engineering Course

मोफत इंजिनीअरींग

 

स्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेंटिंस परीक्षेद्वारे भारतीय रेल्वेतून इंजिनीयरींगचं शिक्षण मोफत घेता येतं. तसंच प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये पहिल्या वर्षापासून दरमहा स्टायपेंडही मिळतो. प्रशिक्षणानंतर भारतीय रेल्वेच्या मेकॅनिकल इंजिनीअरींग विभागात इंजिनीअर म्हणून नोकरीदेखील मिळते. या अनोख्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतात. यासाठीची प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (यु.पी.एस.सी.) घेते. या परीक्षेसाठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्ष इतकी असते.

लेखी परीक्षा-

या परीक्षेत तीन पेपर्स असतात. एकूण गुण ६०० असतात. पेपर एक, सामान्यज्ञान, इंग्रजी व मानसशास्त्रीय कसोटय़ांवर आधारित असून २०० गुणांचा असतो. पेपर दोनमध्ये, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जातात. (गुण २००) पेपर तीनमध्ये गणितावर आधारित प्रश्न असतात. (गुण २००)

प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारचं असतं. लेखी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीसाठी २०० गुण असतात.

प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. यासाठी www.upsconline.nic.in ही वेबसाइट पहावी. महाराष्ट्रामध्ये परीक्षेचं केंद्र मुंबई व नागपूर इथे असतं. परीक्षा १२ जानेवारी २०१४ला होणार आहे. यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०१३ पर्यंत आहे.

भारतीय रेल्वेच्या मेकॅनिकल विभागामध्ये तरुण अभियंते निवडण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वे चार वर्षांचं प्रशिक्षण देते. चार वर्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांशी करार केला जातो. प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थ्यांची कामगिरी बघून रेल्वेत नोकरी संदर्भात निर्णय घेतला जातो. निवड झालेला विद्यार्थी रेल्वे वर्कशॉपमध्ये आपलं सैध्दांतिक(क्लासरुम टीचिंग) व प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण करतो. या कार्यकालात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा(रांची) या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांनं उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांच्या प्रशिक्षण काळात दरमहा रु. ९१०० तर तिसऱ्या व चौथ्या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांसाठी दरमहा रु.९४०० व पुढच्या सहा महिन्यांसाठी दरमहा रु.९७०० स्टायपेंड दिला जातो. चार वर्षांचं प्रशिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यांला गुणवत्तेच्या आधारावर रेल्वेमध्ये मेकॅनिकल इंजिनीअर या पदावर काम करता येतं.

सविस्तर जाहिरातीसाठी www.upsc.gov.in ही वेबसाईट पहावी. (एक्झामिनेशन नोटिफिकेशन करंट या मार्गाने जाहिरात पहावी )