Gold in Banian Tree

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmailby feather

झाडाच्या पानात सोन्याचा अंश: अभ्यासक

पंढरपूर: मोहोळ आणि मंगळवेढा सीमेवर असलेल्या बेगमपूर गावात सोन्याची खाण असल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर इथल्या मातीत आणि वडाच्या झाडांच्या पानात सोन्याचा अंश असल्याचं सांगण्यात येत आहे.

भीमेच्या काठावर असलेलं बेगमपूर. याच गावातून औरंगजेबानं साडेचार वर्ष हिंदुस्थानचा कारभार हाकला. बेगमपूरमध्ये बादशहाची टांकसाळही होती. त्यामुळं एकेकाळी इथून सोन्याचा धूर निघत होता. आता याच गावातील मातीत आणि वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचे अंश असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

नदीकिनारी उभा असलेला हा वड २०० वर्ष जुना आहे. या वडाच्या पानाची झळाळी सोनेरी आहे.
त्यामुळं पुरातत्व विभागानं गांभीर्यानं याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी.ताकवले यांनी, २००० साली विद्यापीठाची टीम पाठवून इथं संशोधन केलं. इथल्या मातीत कोलार आणि हट्टी गोल्डमाईनपेक्षा जास्त सोन्याचा अंश असल्याचं समोर आलं. याची माहिती भूगर्भशास्त्र विभागाला आणि सरकारलाही दिली. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं अभ्यासकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

शोभन सरकार यांच्यामुळं उन्नावचं खोदकाम देशभर गाजलं. पण तिथंही पुरातत्व खात्यानं केलेल्या संशोधनात टणक धातू असल्याचे पुरावे मिळाले होते.  आता महाराष्ट्रात भीमेकाठी सोनं असल्याचं मातीपरीक्षणात समोर आलं आहे. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करुन खोदकाम केलं तर भीमेकाठच्या मातीतल्या सोन्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा सोन्याचा धूर निघेल.