Pisces Sign – Pisces Characteristics – Meen Rashi

मीन राशीची वैशिष्ट्येPisces Sign – Pisces Characteristics – Meen Rashi

मीन राशी ही मोक्षाची राशी समजली गेली आहे. अध्यात्म, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण सत्संग, परोपकार, पवित्र आचरण याद्वारे संसार नेटका करून, भवसागरातून तरून जाणारी ही राशी आहे. चौरयांशी लक्ष योनिचा शेवटच जणू येथे होतो व राशीचक्राच्या शेवटच्या या राशीत क्रांतीवृत्ताचे राहटगाडगे संपून व्यक्ती मुक्त होते.

Pisces

Pisces


राशीचक्राची बारावी आणि शेवटची राशी मीन. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे शेवटचे चरण, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती हे पूर्ण नक्षत्र यांचा मीन राशीत समावेश आहे. ही राशी जलतत्त्वाची असून, स्त्री स्वभावाची आहे. द्विस्वभावी आहे. तसेच या राशीचे स्वामित्व गुरुमहाराजांकडे आहे. विरुद्ध दिशांना तोंड करून संचार करत असलेले दोन मासे हे या राशीचे मोठे सूचक बोधचिन्ह आहे. स्त्री राशी, जलतत्त्व यामुळे हळवेपणा, द्विस्वभावामुळे चंचलता व गुरुच्या स्वामित्त्वामुळे पापभिरू पणा, असे या मीन राशीच्या व्यक्तीच व्यक्तीदर्शन होते. या राशीचा स्वामी भारतीय ज्योतिषानुसार ‘गुरू’ व पाश्चात्त्य ज्योतिषांनुसार ‘नेपच्युन’ हा आहे.

‘मीन’ या व्यतिरिक्त या राशीचे काही अन्य पर्यायवाचक शब्द आहेत. अंतिम, अंत्यम, अन्त्यगम, कन्द, तिमि, मत्स्य, अंडज, अनिमेष, जलचर तर इंग्रजीत यास ‘पिसीस’ म्हणतात. ज्या व्यक्तीची चंद्रराशी ‘मीन’ आहे, त्यांना या राशीचे बरेचसे गुणधर्म लागू होतात. त्याचप्रमाणे ज्यांचे ‘मीन लग्न आहे, (लग्नराशी मीन आहे) त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारच्या गुणधर्माचा प्रभाव असतो. ‘मीन’ ही राशीचक्राची एक अत्यंत जटिल राशी आहे. या राशीच्या दुहेरी स्वभावामुळे या व्यक्ती दोन परस्परविरुद्ध दिशांकडे ओढली जाते. या मानसिक गोंधळामुळे त्यास असे वाटावयाला लागते की सर्व काही चुकीचे आहे. त्यामुळे पुष्कळदा योग्य निर्णय घेणे कठीण जाते. या मीन व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व साधेसुधे, गौरवर्ण, उंचीला मध्यम आणि तसे पाहिल्यास या राशीचे बरेच जण स्थूल असतात. स्वभाव मानी परंतु हळवा असल्याने, अपमान झाल्यास त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येते.  त्यांच्यावर बाजू उलटल्यास चेहरा गोरामोरा होतो. थोडक्यात म्हणजे हे लोक अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्यावर इतरांची छाप सहजपणे पडते.

बोलण्यात फार लवकर हार जाणारी मीन राशी असते. ‘बुध’ या राशीत निचीचा धरला आहे, यावरून लक्षात येईल की बुधासारखा वाचेचा तरतरीपणाचा बुद्धीचा ग्रह जे कारकत्व दर्शवितो, त्याचे मीनेला वावडे असते. मीन व्यक्तीला अस्कलीखित बोलणे, विनोबुद्धी, हलकीफुलकी मनोवृत्ती यांचे जरा वावडेच असते. मीन ही व्यक्ती समाजात, नातेवाईकांच्यात मोकळेपणाने खिलाडूपणाने वागू शकत नाही. कर्तव्यतत्पर स्वभाव व पापभिरूपणा या गोष्टी त्यांच्या सहजवृत्तीवर दडपण आणतात. स्वभावात चंचलपणाही असतो. बरयाच मीन व्यक्ती भोळसट, अंधश्रद्धा असलेल्या, चिडचिड्या, लहान सहान संकटांनी गडबडून जाणारया, मनात अढी धरणारया, मनाच्या गोंधळामुळे पसारा वाढवणारया, निर्णयात परावलंबी असलेल्या असतात. मीन व्यक्ती ही धार्मिक, परमार्थी, अध्यात्मिक वगैरे असण्यापेक्षाही पापभिरू असते, हेच खरे.

मीन व्यक्तींचा स्वभाव मात्र सहनशील असतो, गरीब असतो. सुडाला प्रतिसूड देण्याचा कणखरपणा नसतो. मीन स्त्री दिसण्यात सात्विक असते. अलंकार, फॅशन किवा आधुनिक राहणी तिला फारशी मानवत नाही. दुसरयाचे मत आपल्याविषयी वाईट होऊ नये, म्हणून ती फार काळजी घेते. मीन पुरुष संसारात जरा जास्तीच रमतात. आपले छोटे घरटे सांभाळण्यात व प्रेमाची देवाणघेवाण करण्यात त्याला आनंद होतो. व्यवसायापेक्षा नोकरीत जास्ती रमतात.

मीन राशीच्या व्यक्तींना धकाधकीच्या दाहक वातावरणापेक्षा चेहरयावरील केविलवाण्या भावाने दुसरयाच्या मनात सहानुभूती निर्माण करणेच त्यांना पसंत असते. अन्यायाविरुद्ध आपल्या घणाघती व्यक्तीत्वाने लढण्यापेक्षा असह्य रुदनानेच त्या मेहरबानीची मागणी करतात. कठोर शब्द हे लोक कोणालाच बोलू शकत नाही. मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्यास मीन व्यक्तीला फार मानसिक त्रास होतो. उलट्या होतात, झोप लागत नाही.

मीन व्यक्ती ही अत्यंत भावूक असते. व्यक्ती व परिस्थिती याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रियेत भावनेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या अतिद्रिय ज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीवर ते निष्कारणच प्रेम करावयास लागतात वा एखाद्या व्यक्तीचा ते निष्कारणच तिरस्कार करावयास लागतात. त्यांच्या या भावनेमागे वा प्रतिक्रियेमागे तर्क अजीबात नसतो. या लोकांच्या ठायी सहानुभूती देखील भरपूर असते. जेव्हा जेव्हा हे लोक एखाद्या व्यक्तीस अडचणीत सापडलेली पाहतात वा एखादी व्यक्ती ही दु:खी किवा रोगी असल्याचे पाहतात, तेव्हा तेव्हा त्यांना त्या व्यक्तीच्या मदतीस धावून जावेसे वाटते. काही लोक त्यांच्या या प्रवृत्तीचा गैरवाजवी फायदा घेतात.

या राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती ही बरीच सुविकसित झालेली असते. ते मूलत: आदर्शवादी असतात व जगाच्या कठोर वास्तवापासून दूर पळून जाऊन, स्वप्नांच्या साम्राज्यात दंग होणे, हे यांना प्रिय असते. याच कारणाने अनेक महान कवी, लेखक व संगीतज्ज्ञ याच राशीचे पुरातन विचारानुसार गुरू या राशीचा स्वामी असल्याने, त्यांच्यात पापभिरूता आणि श्रद्धा प्रामुख्याने आढळते. नवीन विचारानुसार नेपच्यून हा अस्पष्ट, अनभिज्ञ आणि स्वप्नाळू ग्रह या राशीचा मालक आहे. त्यामुळे जे वास्तवात नाही, अशा गोष्टींकडे या राशीच्या व्यक्तींचे लक्ष ताबडतोब आकर्षित होते. जीवनाचे नेमके उद्दिष्ट ठरवणे, या राशीला अवघड जात असल्याने, त्यांच्या प्रयत्नात सातत्यापेक्षा धरसोडपण जास्त असतो. अभिनयाचा वरदहस्त या राशीला लाभला आहे. सिनेसृष्टी, कलाक्षेत्र असले व्यवसाय यांना आकर्षित करतात.

नक्षत्रांचा प्रभाव : पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती ही तीन नक्षत्रे या राशीत आहेत. पूर्वाभाद्रपदा नक्षत्र नशीबवान असते. ज्यावेळी जे हवे, ते त्यांना मिळते. जीवनाचा दृष्टिकोन उदात्त असतो. उत्तराभाद्रपदा नक्षत्रात भीती असते. त्यामुळे यशाचे प्रमाण कमी असते. रेवती नक्षत्र कलात्मक  आहे. पण मानसिक चंचलतेमुळे त्यांना कधीच समाधान लाभत नाही. उत्तराभाद्रपदा हे नक्षत्र शनिच्या मालकीचे आहे. त्यामुळे मालकी शनिची आणि रास गुरुची अशा दोन्ही प्रचंड बलाढ्य आणि सामथ्र्यशाली ग्रहांचा वारसा या नक्षत्राला लाभला आहे.

वैद्यकीय ज्योतिषशास्त्र : राशीचक्रात मीन राशी ही पायांचे (पावलांचे) प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या राशीच्या पायांचे आजार व दुखणी होऊ शकतात. पायांच्या अस्वाभाविक रचनेमुळे त्यांना सुयोग्य व सोयीची पादत्राणे मिळणे, हे देखील कठीण जाते. स्वास्थ्याबद्दल बोलायचे झाल्यास मीन व्यक्तींना सर्वाधिक भय हे मानसिक रोगांचेच असते. आत्यंतिक काळजी केल्याने, त्यांच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम व्हायची शक्यता असते. अनेक मीन व्यक्तींना बेरीबेरी, पक्षाघात यासारखे आजार व्हायची शक्यता असते. शरीरातून, विशेषत: हातापायांमधून वारंवार घाम येतो.

आर्थिक बाजू आणि कार्यक्षेत्र : मीन व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पैशांना विशेष महत्त्व नसते. त्यांच्यासाठी पैसा हा साधन असतो, सिद्धी नव्हे. आर्थिक व्यवसाय म्हणजे विदेशी माला आयात, निर्यात तसेच नर्सिंग व्यवसाय, उपहारगृह संचालन, सामाजिक कार्य, शिक्षण, लेखापाल इत्यादी व्यवसाय फायदेशीर ठरतात. हे लोक चांगले लेखक व चित्रकार देखील बनू शकतात. व्यवसायात भागीदारी ठेवणे, हे त्यांच्या दृष्टिने योग्य राहते.

अन्य विशेष माहिती : मीन राशी ही उत्तर होते. दिशेची द्योतक असते. या राशीचा वर्ण पांडुर (पीताभश्वेत) म्हणजे पिवळसर पांढरा सांगितलेला आहे. त्यांचा स्वामी गुरुचा मूलांक तीन आहे. हा अंक साहित्य, कला व वाणीद्वारे अभिव्यक्तीचा प्रतीक असतो. पाश्चात्त्य ज्योतिषानुसार या राशीचा स्वामी नेपच्यूनचा अंक सात असतो. हा अंक रहस्यमय मानला जातो व तो व्यक्तीस कुठल्याही अज्ञात रहस्याच्या संशोधनाकडे प्रवृत्त करू शकतो. मीन व्यक्तीत हा अंक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मीन राशी गुरवारचे प्रतिनिधीत्व करते. या राशीचे रत्न पुष्कराज आहे.

मीन राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती : या राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, मा. दीनानाथ, बापू नाडकर्णी, जमनालाल बजाज, हेमामालिनी, देव आनंद, गुरू गोविदसिह, राजे शहाजी तर मीन लग्नावर जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, रविद्रनाथ टागोर, न. सि. फडके, विनोबा भावे, संत तुकाराम, पं. रविशकर, गॅलिलिओ, लुई आर्मस्ट्राँग वगैरे.