Want to make career as Doctor

डॉक्टर व्हायचंय?

वैद्यकीय प्रवेशांसाठी आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ NEET या परीक्षेएवजी ‘एमएच-सीईटी’ MH-CET ही परीक्षा द्यावी लागणार आहे; पण ‘एमएच-सीईटी’ MH-CETच्या काठिण्यपातळीत मात्र नक्कीच फरक पडला आहे. आता तुम्हाला या परीक्षेसाठी फक्त बारावीचाच नव्हे, तर अकरावीचा अभ्यासही कसून करावा लागणार आहे.

या वर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही. या वर्षी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ८५ टक्के प्रवेश महाराष्ट्र शासन घेणार असलेल्या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेतूनच (एमच-सीईटी) होणार आहेत, हे पूर्वीच निश्चित झाले होते. गेल्याच आठवड्यात या प्रवेश परीक्षेचे स्वरूपही निश्चित झाले. तरीही विद्यार्थी व पालकांच्या मनात त्या विषयी अनेक शंका आहेत. या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी माहिती देत आहोत.

या परीक्षेत अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. ‘नीट’ऐवजी ‘एमएच-सीईटी’ MH-CET द्यावी लागणार, ही बातमी कळल्यापासून अनेक विद्यार्थ्यांनी असे गृहीत धरले होते, की ‘एमएच-सीईटी’ MH-CETही परीक्षा आजवर जशी फक्त बारावीच्या अभ्यासक्रमावर होत होती, तशीच या वर्षीही फक्त बारावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित असेल. अशा विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीवरील लक्ष काढून घेतले असण्याची शक्यता आहे; पण आता हा गोंधळ दूर झालेला असल्याने त्यांना आपल्याला किती तयारी करायची आहे, याचा अंदाज आला असेल. सुदैवाने हा निर्णय दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आल्याने आगामी तीन आठवड्यांच्या सुट्टीचा उपयोग अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी होऊ शकतो.

अकरावीचा अभ्यास महत्त्वाचा

या परीक्षेत अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही; परंतु जर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळ, गुण इत्यादी गोष्टी ‘नीट’प्रमाणेच असतील, तर एकूण (१८०) प्रश्नांपैकी ४० टक्के प्रश्न (७२) अकरावीच्या अभ्यासक्रमावर, तर ६० टक्के प्रश्न (१०८) बारावीच्या अभ्यासक्रमावर असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळणार आहेत. याचा अर्थ असा, की अकरावीच्या अभ्यासक्रमावरील सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक देता आली, तर ७२० पैकी २८८ गुण मिळू शकतात. या वर्षी ‘नीट’ दिलेल्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले असता, कोणत्या कॉलेजात प्रवेश मिळाला, याचा आढावा घेतलात, तर अकरावीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नांच्या गुणांचे महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे आमचा मुख्य सल्ला हाच राहील, की येत्या दिवाळीच्या सुट्टीत प्रथम अकरावीच्या अभ्यासक्रमाची तयारी पूर्ण करा. अकरावीचा अभ्यासक्रम शिकून त्यावरील परीक्षा देऊन सहा महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरला असाल. तेव्हा पुन्हा एकदा बोर्डाचे पाठ्यपुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. एक फायदा असा आहे, की या सहा महिन्यांत तुमचे वय वाढले आहे. अर्थातच, तुमचे आकलनही वाढलेच असणार. ज्या संकल्पना तुम्हाला अकरावीत शिकताना समजल्या नसतील, त्या या अभ्यासात समजतील. तात्पर्य काय, की तुम्हाला वाटतो, तेवढा अकरावीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास अवघड जाणार नाही. या अभ्यासामुळे तुमच्या अकरावीच्या अभ्यासक्रमातील ज्या संकल्पना स्पष्ट होतील, त्याचा उपयोग तुम्हाला बारावीच्या अभ्यासक्रमावरील तयारीसाठीसुद्धा होईल. अकरावीच्या तयारीमुळे अभ्यासाची सवय लागेल. अकरावीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्न सोपे वाटू लागले, त्याची उत्तरे बरोबर येत गेली, की अर्थातच तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आणि ‘जमतंय रे बाबा,’ असे छानसे फीलिंगही येईल.

बारावीची तयारी

अकरावीचा अभ्यासक्रम तयार झाला, की बारावीच्या तयारीला सुरुवात करा. तोपर्यंत बारावी अभ्यासक्रम वर्गात, क्लासमध्ये शिकवून झालेला असेल. अकरावीच्या तयारीचा उपयोग ज्या धड्यांच्या अभ्यासासाठी होईल, अशा बारावीच्या धड्यांची तयारी आधी करा, म्हणजे सोपे जाईल. तयारी खालीलप्रमाणे करता येईल.

> प्रत्येक धडा बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातून वाचा. ओळन्ओळ शब्द अन् शब्द वाचा. मेमरी-बेस्ड प्रश्न पुस्तकातील कोणत्याही ओळीवर, शब्दावर येऊ शकतो. त्यासाठी एकही शब्द गाळू नका.

> प्रत्येक धड्यातील व्याख्या, नियम, गृहितके एका वहीत लिहून काढा.

> प्रत्येक संकल्पना नीट समजावून घ्या. त्यासाठी संदर्भग्रंथ (ज्यांची यादी पुस्तकात शेवटी दिलेली असते) वाचा. शिक्षकांना शंका विचारा. एकदा तुम्हाला एखादी संकल्पना नीट समजली, की त्यावरील कोणत्याही बहुपर्यायी प्रश्नाचे (multiple choice question) उत्तर, तो प्रश्न कितीही फिरवून, वेगळया पद्धतीने किंवा अवघड शब्दांत विचारला, तरी देता येईल.

> थिअरीची अशी छान तयारी झाली, की प्रत्येक धड्यावरची गणिते सोडवायला हवीत. किती सोडवावीत, या संख्येला मर्यादा नाही. जोवर तुम्हाला एखाद्या धड्यावरील तयारीची पूर्ण खात्री वाटत नाही, तोवर त्या धड्यावरील गणिते सोडवत राहा. यामुळे त्या धड्यातील सर्व सूत्रे (formulae) आपसूक पाठ होतील. सुरुवातीला गणित सोडवायला जास्त वेळ लागेल कदाचित; पण पुढे सरावाने तो कमी होईल. तुम्हाला तुमच्या चुका कळतील. आकडेमोडीचा वेग वाढेल, जो तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेत उपयोगी पडेल.

> यानंतर सर्वांत शेवटी प्रत्येक धड्यावरील बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions) सोडवायला घ्या. त्यासाठी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्या विषयासाठी कोणत्या प्रकाशनाचे पुस्तक वापरावे, हे तुमच्या त्या विषयाच्या शिक्षकांना किंवा मागील वर्षी ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला विचारून घ्या. कमीत कमी प्रत्येक धड्यावरील ५० प्रश्न तरी सोडवा. ऑनलाइन वेबसाइटचा यासाठी सर्वांत चांगला उपयोग होतो. यात तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर, त्याचे सोल्युशन किंवा स्पष्टीकरण तर मिळतेच; पण यात काही शंका असेल, एखादी पायरी समजली नसेल, तर त्याचे निरसनही करून घेता येते.

अशा चार टप्प्यांतील तयारी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत करावी. त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे, असे मी सुचवेन.