Amitabh Bachchan and Rekha

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांचा ‘सिलसिला’ कदाचित पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आपण रेखासोबत एकत्र काम करायला तयार असल्याचे दस्तुरखुद्द अमिताभने जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात अमिताभ आणि रेखा यांच्या चाहत्यांना दीर्घ कालावधीनंतर आपली आवडती जोडी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर पाहाण्याची संधी मिळू शकते. आगामी ‘शमिताभ’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह रेखाही आहे. पण विशेष बाब म्हणजे हे दोघे एकत्र आहेत, असा प्रसंग चित्रपटात नाही. त्यामुळे चित्रपटात ते दोघेही असले तरी पडद्यावर एकत्र दिसलेले नाहीत. ‘शमिताभ’ चित्रपटाचा दिग्दर्शक आर. बाल्की याला अमिताभ आणि रेखा यांनी पुन्हा एकदा एकत्र काम करावे, असे वाटते आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अमिताभ यांनी आपण रेखासोबत पुन्हा काम करायला तयार आहोत, असे सांगितले. ‘शमिताभ’ चित्रपटात रेखाचीही भूमिका आहे; पण आम्ही एकत्र दिसलेलो नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक आर. बाल्की याची आम्ही दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम करावे, अशी इच्छा आहे. जर चांगली संहिता आणि भूमिका मिळाली तर रेखासोबत पुन्हा नक्की काम करू असा विश्वासही अमिताभने या वेळी व्यक्त केला. अमिताभ रेखासोबत पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी तयार असला तरी यावर रेखाची काय प्रतिक्रिया हे कळू शकलेले नाही. पण भविष्यात हा योग जुळून आला तर बॉलिवूड आणि त्या दोघांच्या चाहत्यांसाठीही ती उत्सुकतेची बाब ठरेल.