Diet Tips

डाएटच्या टिप्स

diet

आपल्या शरीराला ज्या प्रकारच्या, जितक्या प्रमाणातल्या आहाराची गरज असते, तो आहार म्हणजे डाएट. घरच्या बाईचं डाएट तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत, डॉ. प्रेरणा बावडेकर यांनी…

मुलं शाळेत गेल्यावर, नवरा ऑफिसात गेल्यावर मग निवांत खाऊ असं म्हणत अनेकजणी सकाळचा नाश्ताच करत नाही. फक्त २-३वेळा चहा पित राहतात आणि थेट दुपारचं जेवण घेतात. त्यातही मग आदल्या दिवशीचा उरलेला पदार्थ बाईच्याच पानात पडतो. हे टाळायला हवं कारण ते शरीरासाठी ते उपयोगी नाही. सकाळी उठल्यावर एका तासाच्या आत पोटात काहीतरी जायलाच हवं. मग सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या, लिंबूपाणी घ्या. किंवा उत्तम उपाय म्हणजे कोणतंही एखादं फळ खा. ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकिंग द फास्ट आपण रात्रीच्या जेवणानंतरचा उपवास सोडत असतो. तो फळाने सोडला तर पोटही शांत राहतं आणि पचायलाही सोपं जातं. दरवेळी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा असे पदार्थच हवेत असं नाही. फळं खाल्ली, दूध प्यायलं तरी पुरेसं असतं. नाश्ता नीट न केल्यामुळेच मग अनेकींना नाही नाही ते आजार होतात. बारीक बायकांमध्येही फॅटचं प्रमाण वाढतं.

आता ज्या नोकरीला असतात त्यांची तर वेगळीच धावपळ होते. घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्याच्या नादात दरवेळी परिणाम होतो, तो जेवणावरच. दिवसातून चारवेळा फळं खायला हवी. नाश्त्यामध्ये, साधारण ११-११.३०च्या सुमारास, दुपारच्या जेवणासोबत एखादं फळ किंवा सॅलड आणि संध्याकाळी अशा वेळांत फळं पोटात जायलाच हवीत. आमटी भाजीत ‌मीठ थोडं कमीच वापरा. शक्यतो कच्चं ‌मीठ थोडं खा. आठवड्यातून दोनतीनवेळा पालेभाज्या असायला हव्यातच. कडधान्य करायला सोपी म्हणून रोज खाऊ नका. दुपारी जेवणात सॅलड असायला हवं. पण एखाद दिवशी फक्त काकडी, एखाद दिवशी फक्त ‌कांदा, एखाद्या दिवशी फक्त टोमॅटो असं काहीही खाऊ शकता. ऑफिसमध्ये सलाड न्यायचं तर शक्यतो, चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक डबे किंवा स्टील, काचेच्या डब्यांतून ते घेऊन जा. त्यातही मीठ कमी आणि लिंबू, कोथिंबीरीचा जास्त वापर करा.

रात्रीच्या जेवणात तुम्ही गरमागरम सूप घेऊ शकता. त्यासाठी घरात जेवढ्या भाज्या आहेत, त्या सगळ्या कुकरमध्ये उकडवून घ्या. त्यात मीठ, मिरीपूड घालून उकळून पिऊन टाका. शक्यतो हवाबंद किंवा रेडी टू इट सूप्स टाळा. दिवसभरामध्ये चहा-कॉफी, कृत्रिम शीतपेयं कमी प्या. त्याऐवजी ताक, लिंबू सरबत, गरम पाणी प्या. ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय आहे.

ज्यांची नाइट शिफ्ट असते किंवा रात्रीचं काम असतं, त्या बायकांनी दुपारचं जेवण व्यवस्थित घ्यावं. येताना डबा घेऊनच आलात तर श्रेयस्कर. ७-७.३० किंवा ८पर्यंतच जेवायची सवय लावून घ्या. काम करता करता एका बाजूला पटकन डबा खाऊन घेता येतो. लवकर जेवणं कधीही उत्तमच. त्यानंतर भूक लागली तर कितीही फळं खाता येतात. दूध भरपूर नाही पण सकाळी किंवा रात्री एक ग्लास घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो.