If there is no color in this world?

या जगात रंगच नसतील तर…?

painting

रंगच नसतील तर दिसेल तरी काय..? डोळ्यांची दृष्टी जिकडे जाईल तिकडे कसं दिसेल हे जग…? हे वाचताक्षणी पाहिलं तरी कळेल…! खरंतर ही फक्त कल्पनाच होऊ शकते. खरंच तसं पाहिलं तर काय आहे या रंगांमध्ये..? दिलेल्या नावाप्रमाणे ज्यांचं त्यांचं अस्तित्व हे नेहमी जाणवतं… पण… त्याही पुढे जाऊन या रंगांचं एक रहस्यही आहे.

रहस्य एवढ्याकरताच की, मानवजातीने नावे दिलेल्या रंगापलीकडे अगणित असे रंग हे निसर्गात आहे. आपण पाहिलंत तर लक्षात येईल…! त्यांना आपण ‌कोणतंही नाव दिलं नाही तरी चालेल. खरं तर न दिलेलंच बरं…! व्यावहारिक भाषेत रंगांना दिलेल्या नावाचं काहीसं स्थान असलंही पाहिजे. परंतु शोधाच्या भूमिकेत मात्र त्याला स्थान नसावे. कारण तिथे शब्द फसवे असू शकतात. आणि शोधातून शुद्धतेकडे जाणारा मार्ग चुकू शकतो. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर पावसाळ्यातील विटांच्या जुन्या भिंती बाहेरून शे‍वाळल्यासारख्या दिसतात.

नीट पाहिलं तर तिथे अनेक रंग आपल्याला दिसतील तसेच शेवाळलेले दगड, झुडपांची पाने अशी अनेक ठिकाणं निसर्गात आहेत. कोणत्याही स्पष्टीकरणविरहित पाहिलं तर त्यांचं नावीन्य आपल्या लक्षात येतं.

हे झालं माहिती नसलेल्या रंगाबद्दल… परंतु… माहिती असलेल्या रंगांबद्दलसुद्धा असंच काहीतरी आहे. कारण आपण काही जण रंगांना रंग म्हणून पाहतो. तर काही त्या रंगांना सुचिन्हांची जोड देतात. त्यातून मोठमोठी प्रतीकंही निर्माण होतात. ह्या प्रतीकांतून मोठी हिंसाही होते ही गोष्ट वेगळीच, परंतु ती काहींच्या जगण्याचा भागही बनून जातात.

कारण या रंगांमध्ये व्यापकतेबरोबर एक चैतन्यही आहे. सोबत शुद्धतेकडे घेऊन जाणारा प्रदीर्घ प्रवासही आहे. तर काहींना भावणारं शहाणपणसुद्धा त्यात आहे.

‘ड्रिंक द ब्लू, ड्रिंक द स्काय, ड्रिंक द विसडम्’ असं शीर्षक असलेलं चित्रकार रमेश थोरात यांचं चित्रं व इन्स्टॉलेशन्सचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, कुलाबा, मुंबई येथे २ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रमेश थोरात यांनी सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् येथून कलाप्रवासाची सुरुवात केली. दैनंदिन जीवनातील परंतु अंर्तमनातील विविध आशयानुरुप विषय घेऊन त्यांनी कलाकृती केलेल्या दिसतात. संबंधित प्रदर्शनातील कलाकृतींत हे दिसते. त्यातूनच निळ्या रंगाविषयीचं त्यांचं आकर्षणसुद्धा लक्षात येते. आकर्षणच का…? तर त्यांना तो व्यापकतेकडे घेऊन जातो.

निळ्या रंगाची ती व्यापकता खरंच कुठे दिसत असेल तर ती म्हणजे नजर न मावेल इथपर्यंत दिसणाऱ्या आकाशात. व्यापकता आणि अवकाश तिथं जास्त जाणवतो. मनाने ही इतकं व्यापक होता येईल तर त्यात किती मोठं शहाणपण आहे. रमेश थोरात यांना निळ्या रंगाच्या संवेदना व्यापकतेकडे घेऊन जातात. त्याहीपुढे त्या शहाणपणाकडे घेऊन गेलेल्या दिसतात. चित्रांमध्ये काही कामगार एकमेकांबरोबर व्यक्त होताना दिसतात. ‘जे पेरतो तेच उगवते’ या वचनाप्रमाणे त्याचं एक इन्स्टॉलेशनही कलात्मक रीतीने पहायला मिळतं. एका लाकडी पृष्ठभागावरती खिळ्यांचे कमीअधिक उंचीचे मनोरे उभे करून त्यावर बुद्धिबळाच्या पटावरील सोंगट्या आहेत. त्यापैकी प्यादे हे सर्वात उंच मनोऱ्यावरती ठेवून इतर सगळे त्याच्या खालील मनोऱ्यावरती आहेत.

हे इन्स्टॉलेशन पाहून लक्षात येते की, जसे राजाचा मुलगा राजाच होईल असे नाही. तर कुणीही का असेना तो त्याच्या संपादित कौशल्याने उंची गाठू शकतो. रमेश थोरात यांच्या मनातील संवेदना व त्यांचं कलाकृतीतील स्थान आपल्याला नक्कीच अंर्तमनातील शहाणपणाकडे घेऊन जाते.

कोणत्याही प्रकारची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मग ती रोजच्या जगण्यातली असू देत किंवा कामगारांच्या नेहमीच्या संघर्षातली असोत. आपल्या विशिष्ट शैलीतून चित्रकार वलय शेंडे यांनी डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (राणीबाग) भायखळा, येथे २८ फेब्रुवारीपर्यंत इन्स्टॉलेशन्सचे प्रदर्शन भरवले आहे. अनेक भेदक अशा वस्तुस्थिती आपल्याला त्यांच्या कलाकृतींमधून पहायला मिळतात.

विदर्भातील भयानक पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या अशा अनेक संवेदनशील विषय त्यांच्या कलेद्वारे ठळक सामोरे येतात. याच ठिकाणी अजून एक प्रदर्शन पहायला मिळणार आहे ते म्हणजे चित्रकार अतुल दोडिया यांचं ‘ए प्रोजेक्ट फॉर द रिपब्लिक ऑफ इंडिया’.