Interview of Girish Kulkarni Marathi Actor

मनोरंजनाचा अर्थ शोधायला हवा !

girish

अभिनय… ही संकल्पना खऱ्या अर्थानं जगणारा अभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णीचं नाव घेतलं जातं. नाटकाचं दिग्दर्शन, लेखन, पटकथाकार, अभिनय असं अष्टपैलू काम करणारा हा अभिनेता आता सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. ‘मी अभिनय हा फक्त पोटापाण्यासाठी करत नाही असं ठामपणे सांगण्यापासून, मनोरंजन या संकल्पनेनाचा नेमका अर्थ शोधण्याची गरज आहे’, असं त्याला वाटतं.

अभिनेता म्हणून यशस्वी कामगिरी सुरू असतानाच, अचानक दिग्दर्शनात पाऊल का टाकावसं वाटलं?

नाटक करत असताना मी दिग्दर्शनच जास्त केलं आहे. उमेश विधिवत प्रशिक्षण घेऊन दिग्दर्शक झाला तर मी लिखाण आणि अभिनय करत राहिलो. कोणतीही गोष्ट मी प्लॅन करून कधीच केली नाही. सिनेमाच्या तांत्रिक बाबींची समज पुरेशी व्हावी, असं वाटत होतं. त्यात उमेशचाही आग्रह वाढला, मग एक नवा शोध म्हणून सिनेमाचं दिग्दर्शन करायचं ठरलं.

मराठी सिनेमासाची व्यावसायिक गणित पाहता निर्मात्यांचे पैसेही वसूल होऊ लागले आहेत. यात कितपत तथ्य वाटतं?

हे सत्य मोजक्या सिनेमांपुरतं मर्यादित आहे. मराठी सिनेमाची प्रेक्षकसंख्या वाढली आहे. पैसे देऊन सिनेमे पाहणाऱ्यांची संख्याही वाढली आहेत. ही ऊर्जितावस्था, चांगल्या कलाकृतींसह सातत्यानं टिकवणं आणि मराठी सिनेमाला आर्थिक स्थिरता देणं, हे यापुढचं खरं आव्हान आहे.

त्याचवेळी ‘अस्तु’, ‘धग’ यासारख्या सिनेमांना वाली नसतो, हे कशाने बदलेल?

मनोरंजन हे अभिरुचीसंपन्नतेचा विचार करतं की पाचकळ विनोद, कर्णभेदी संगीत इथपर्यंतच मर्यादित झालं आहे का, टिव्हीच्या वरवंट्याने ही अभिरूची आपण हरवली आहे का, साहित्य-कला-संस्कृती याबाबतचा सकस व्यवहार कुठे गेला याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझ्या निरिक्षणानुसार सांस्कृतिक पोषण कमी पडतं आहे. माझ्या नव्या सिनेमात मी याच गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

अग्लीतल्या भूमिकेचं कौतुक झालं. हिंदीत झळकण्यासाठी दुय्यम भूमिका स्वीकारशील का?

कोणतेही प्रयत्न न करता ही भूमिका माझ्याकडे चालत आली. बाकी या व्यावसायात अभिनेता म्हणून येतानाच परावलंबित्व आहे, याची जाण मला होती. हिंदीत काम केल्यानं प्रसिद्धी मिळते हे खरं आहे, पण माझ्यासाठी समाधान अधिक मोलाचं आहे. मला कसलीही घाई नाही आणि कोणासमोर काही सिद्धही करायचं नाहीय. अभिनेता म्हणून निखळ समाधान देणारं काम मी स्विकारतो.

अनुरागकडून कोणती गोष्ट घ्यावीशी वाटते?

तो प्रचंड ऊर्जेनं काम करतो. तो एकाच गोष्टीचा अनेक अंगानं विचार करू शकतो. नव्या गोष्टी धाडसानं करतो. ते करताना त्याच्यात असणारं लहान मुलांसारखं कुतूहलंही नेहमी जागं असतं. त्याचं संयम ठे‍वून काम करणं मला भावलं.

सेन्सॉर बोर्ड आणि तिथं मराठी सिनेमाबाबत होणारा दुजाभाव याबाबत तू तुझ्या परीनं लढा देणार, असं सांगितलं आहेस त्याबाबत काय सांगशील?

कलाकार म्हणून वावरताना भान आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी आवश्यक वाटतात. ही जाणीव सतत स्वतःला देत राहणं गरजेचं आहे. राजकीय दडपशाहीबाबत निर्भयपणे बोलणं आणि स्वतःची दुरूस्ती करत नैतिक बळ असणंही गरजेचं आहे. एकटा किंवा समूह म्हणूनही हा विचार व्हायला हवा.

राष्ट्रीय पुरस्कारानंतर वाढलेल्या जबाबदारीचं दडपण येतं का?

मी पुरस्कार नजरेसमोर ठेऊन काहीच केलं नाही. कामाचं कौतुक पुरस्कारांनी झालं हे चांगलंच आहे, त्यानं प्रोत्साहन देण्याचं काम केलं. पण सतत पुरस्कार विजेता हा टॅग मिरवणं मला महत्त्वाचं नाही वाटतं. पण वाढलेल्या अपेक्षांचं दडपण आहे.

girish kulkarni movies girish kulkarni biography girish kulkarni wife girish kulkarni wiki girish kulkarni actor girish pandurang kulkarni advocate girish kulkarni