Keep yourself control Malyaria

तुम्हीच ठेवा मलेरिया आटोक्यात

कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या इमारतीत रहिवाशांवरच जबाबदारी

मलेरिया आणि डेंग्यू डासांच्या अळ्यांचा शोध घेण्यास जाणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना उच्चभ्रू इमारतींमध्ये अटकाव केला जातो. त्यावर पालिकेने इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनाच डासांच्या अळ्या शोधण्याच्या कामाला लावले आहे. अळ्या ओळखण्यासाठी पालिकेने रहिवाशांसाठी प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षणही सुरू केले आहे.

पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूने डोके वर काढल्याने पालिकेने घरोघरी जाऊन फुलदाण्या, घरांच्या परिसरात डासांच्या अळ्या शोधण्याचा धडाका लावला. या शोध मोहिमेत चाळी, झोपडपट्ट्यांपेक्षा उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीत डासांच्या अळ्या अधिक आढळून आल्या. काही भागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिक घरात प्रवेश करू देण्यास मनाई करत असल्याने शोधमोहिमेस अडथळा निर्माण झाला.

नवीन वर्षांत मलेरिया, डेंग्यूला अटकाव करण्यासाठी पालिकेने रहिवाशांनाच अळ्या शोधण्याचे आवाहन केले आहे. रहिवाशांनी आपल्या इमारतीतील काही सभासद नेमून हे काम करावे किंवा पेस्ट कंट्रोल अथवा हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्यांना हे काम द्यावे. त्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे, अशी माहिती पालिकेच्या किटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

मलेरिया

तपासणी केलेली घरे

१,१४,६३५

आढळलेली उत्पत्तीस्थाने

१२,९१, ४४२

अळ्या सापडल्या

४,९९२

डेंग्यू

तपासणी केलेली घरे: १,०८,७४,१२२

आढळलेली उत्पत्तीस्थाने: ९७,७१,५४९

अळ्या सापडल्या: ८,५५५

पाठवलेल्या नोटिसाः १७,९०४

ताकीदपत्र: १८८५

दाखल खटले: १२१५

दंडात्मक कारवाई: ३२, ५१, ००० रु.