Secret of soil perfume

मृद्‍गंधाचे सुवासिक रहस्य

earth-smell

 

पावसाचा थेंब मातीवर पडतो, तेव्हा त्यातील त्यात तयार होणाऱ्या बुडबुड्यातून बाहेर पडणाऱ्या एअरोसोलमधील सुगंधी घटकांमुळे मातीचा वास बाहेर पडतो. या मृ‍द्‍गंधाचा माग अखेर वैज्ञानिकांनी काढला आहे…

पहिल्या पावसानंतर वातावरणात भरून जाणाऱ्या मातीच्या वासाने फक्त भारतातच नाही, तर जगभरातल्या परस्परभिन्न संस्कृतींनाही भुरळ घातली आहे. गगनाचा गाभारा भरून-भारून टाकण्याची क्षमता असलेल्या या मातीच्या गंधाची भूल सगळ्याच भाषांमधील शब्दप्रभूंना पडली. मृ‍द्‍गंध किंवा पेट्रिकॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच सुवासाचा माग काढण्यात अमेरिकेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे.

पावसाच्या सरी जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात, तेव्हा जमिनीतील विशिष्ट रसायनांमधून हा सुवास सगळीकडे पसरतो, असा निष्कर्ष दोन ऑस्ट्रेलियन संशोधकांनी साठच्या दशकात काढला. या वासासाठी ‘पेट्रीकॉर’ अशी संकल्पनाची त्यांनी तयार केली. मातीतला हा सुवास पावसामुळे बाहेर पडतो, याची माहिती शास्त्रज्ञांना होती. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, हे मात्र आजवर गूढ होते. अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) शास्त्रज्ञांनी ही प्रक्रिया अतिजलद व्हिडिओच्या साह्याने कॅमेरात पकडली आहे.

मातीचे १६ नमुने आणि १२ अन्य माध्यमे अशा एकूण २८ पृष्ठभागांवर तब्बल ६०० प्रयोग संस्थेच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे असिस्टंट प्रोफेसर क्यूलन आर. बुई आणि त्यांचे सहकारी असिस्टंट प्रोफेसर यंगसू जंग यांनी केले. त्यात त्यांना असे आढळले की, पावसाचा थेंब विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट पद्धतीच्या मातीवर पडतो, तेव्हा त्यामध्ये हवेचे लहान लहान बुडबुडे अडकतात. या बुडबुड्यांमध्ये मातीतले काही कण पकडले जातात. हा पाण्याचा थेंब जेव्हा फुटतो, तेव्हा हे लहान एअरोसोल थेंबाच्या बाहेर पडतात आणि हवेत फेकले जातात. लाटा फुटल्यानंतर किंवा शॅम्पेमवर फेस निर्माण होतो, तशीच ही प्रक्रिया असते. या एअरोसोलमध्ये सुवासिक घटक असतात आणि जमिनीतील जिवाणू आणि विषाणूंसह ही सुवासिक द्रव्ये बाहेर पडतात आणि वाऱ्याचे सर्वत्र पसरतात. हाच मृद्‍गंध.

मातीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा वेग खूप कमी असेल, तर हा थेंब मातीत मुरतो. आणि वेग खूप जास्त असेल, तर हे बुडबुडे तयार होण्याआधीच फुटतात. ‘मातीच्या वासाचे रहस्य या थेंबाच्या वेगात आणि मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे,’ असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. सामान्यतः निर्वात पोकळीचा विचार केला, तर पावसाच्या थेंबाच्या जमिनीवर पडेपर्यंतच्या प्रवासात त्याचा वेग हा थेंबाच्या वजनावर अवलंबून नसतो. मात्र, वातावरणात थेंबाच्या वजनाचा प्रभाव त्याच्या वेगावर पडतो. पावसाच्या हलक्या किंवा मध्यम सरी कोरड्या मातीवर पडल्या, तर हमखास मृद्‍गंध निर्माण होतो आणि आसमंतात पसरतो. मृद्‍गंध पावसाच्या सरीत नसतो, तर मातीतून मुक्त होतो. थेंबाची गती आणि पृष्ठभागाची गुणवत्ता यांनुसार नेमके किती एअरोसोल हवेत फेकले जातील, याचे अनुमान काढण्यातही एमआयटीच्या शास्त्रज्ञांना यश आले. हलक्या किंवा मध्यम पावसात अधिक एअरोसोल हवेत फेकले जातात, तर जोरदार सरी पडत असताना कमी एअरोसोल हवेत सोडले जातात, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

मृद्‍गंधास कारणीभूत असलेल्या एअरोसोलच्या निर्मितीचे गूढ उकलणे एवढेच या संशोधनाचे महत्त्व नाही. तर या संशोधनाच्या आधारे मातीच्या माध्यमातून पसरणाऱ्या काही विशिष्ट रोगांच्या प्रसाराबाबत अधिक माहिती मिळवता येईल, असा विश्वास बुई आणि त्यांचे सहकारी व्यक्त करतात.

पावसावरच अवलंबून असलेल्या जनसमूहांसाठी पावसाची पहिली सर हा टिकून राहण्याचा- सर्व्हायव्हलचा- शुभसंदेश असतो. म्हणूनच, मातीचा या वासाबद्दल असलेली ओढ ही वारशाने मिळते आणि पिढ्यानपिढ्या संक्रमित होते, असे शास्त्रज्ञ मानतात. या संशोधनाने मानवी आयुष्य अधिक निरामय करणाऱ्या अन्य संशोधनांचा मार्ग मोकळा झाला आहे.