Posts Tagged ‘my name is abu salem’

My name is abu salem – Book

बॉलीवूडच्या डॉनची कर्मकहाणी

अभिनेता संजय दत्त याच्यासोबतची सालेमची मैत्री यावर या पुस्तकात एक प्रकरणच आहे. संजय आणि सालेम यांच्या ‘मैत्री’चे तपशील मांडताना आजवर उजेडात न आलेले काही किस्सेही यानिमित्ताने लेखकाने उघड केले आहेत.

एखाद्या व्यक्तीचं चरित्र रेखाटायचं किंवा तिची गोष्ट सांगायची म्हटलं की, त्याची चांगली किंवा वाईट बाजू धरून लिखाण करावंच लागतं. कारण त्यातूनच त्याचा/तिचा चेहरा वाचकांसमोर उभा राहत असतो. व्यक्तिरेखा रुजवण्यासाठी तशी बाजू घेऊन लिहिणं ही त्याची गरजही असते. पण अशा कहाणीला एकतर्फीपणा येऊन बऱ्याचदा लेखकाच्या पुस्तक लिहिण्याच्या मानसिकतेबद्दलही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असते. अर्थात एखाद्याला नायक किंवा खलनायक न ठरवता त्याच्या आयुष्याचे सापेक्ष चित्रण असलेली पुस्तकेही अनेक आहेत. एस. हुसेन झैदी यांचे ‘माय नेम इज अबू सालेम’ हे या दुसऱ्या प्रकारात मोडणारे पुस्तक आहे. कुख्यात माफिया अबू सालेमचा उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी मुंबईत आलेला तरुण ते अनेकांच्या मनात धडकी भरवणारा अंडरवर्ल्ड डॉन असा प्रवास मांडणारं हे पुस्तक सालेमचं पूर्ण चरित्र मांडतं. पण हे करताना झैदी यांनी कुठेही एकतर्फीपणा येऊ दिलेला नाही, हेच या पुस्तकाचं मुख्य वैशिष्टय़ म्हणावं लागेल.
करीम लाला, वरदराजन मुदलियार, हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, अमर नाईक, अरुण गवळी आणि छोटा राजन या माफियांच्या टोळ्यांनी एके काळी मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर राज्य केलं. लाला, वरदराजन आणि मस्तान यांच्या गुंडगिरीचा काळ पूर्णपणे वेगळा होता. मुंबईच्या बंदरात उतरणाऱ्या सामानाची तस्करी, मटके-जुगार यांचे अड्डे, दारूच्या भट्टय़ा इथपर्यंतच माफियांचं तेव्हा अस्तित्व असायचं. दाऊद, अमर नाईक, गवळी आणि छोटा राजन हे मुंबईच्या मुशीतच लहानाचे मोठे झाले आणि नंतर या शहरालाच त्यांनी आपल्या कारवायांची कर्मभूमी बनवलं. बिल्डर-व्यापाऱ्यांकडून खंडणी जमवणं, सुपाऱ्या घेऊन हत्या करणं, हप्ते गोळा करणं, अमली पदार्थाची तस्करी यामधून या माफियांनी आपला जम बसवला. मुंबईला ‘स्वप्ननगरी’ बनवणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित गुन्हेगारीशीही या माफियांचा संबंध असायचाच. पण चित्रपट जगताच्या मनात सर्वात मोठी दहशत निर्माण केली ती अबू सालेमनेच. ख्यातनाम निर्माते गुलशन कुमार यांचे हत्याकांड, शाहरुख खानपासून सुभाष घईपर्यंत अनेक दिग्गजांना ‘लक्ष्य’ करण्याचा त्याचा प्रयत्न, बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जवळीक आणि मोनिका बेदीचे प्रेमसंबंध अशा अनेक कारणांमुळे सालेमची माफिया कारकीर्द चित्रपटसृष्टीच्या अवतीभवती खेळत राहिली. त्यामुळे आजही त्याच्याकडे ‘बॉलीवूडचा डॉन’ असंच पाहिलं जातं.
सालेमची ही संपूर्ण कर्मकहाणी झैदी यांनी अतिशय बारकाईने ‘माय नेम इज अबू सालेम’ पुस्तकातून मांडली आहे. ‘सालेमबद्दल मला कमालीची चीड आहे. त्याचाही माझ्यावर राग असल्याचं अनेकदा समजलं. पण हे पुस्तक लिहिताना तो राग किंवा तेढ मी बाजूला ठेवली,’ असं प्रस्तावनेत म्हणणारे झैदी यांनी हे वचन संपूर्ण पुस्तकात तंतोतंत पाळलं आहे. पण हे करत असतानाही सालेमचा वाचकांना अपेक्षित असलेला खलनायकी चेहरा त्यांनी अचूकपणे समोर आणला आहे. समाजाकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळेच आपण गुंडगिरीत आलो. गुन्हेगारी जगतात असलो तरी आपण गरिबांच्या भल्याचीच कामे करतो. आपलं काहीही चुकलं नाही, असं प्रत्येक गुंडाला वाटत असतं. सालेमही त्याला अपवाद नाही. ‘आपण सलमान खानपेक्षाही चांगले दिसतो,’ अशी त्याची दृढ धारणा होती. गुंड असूनही ‘अपटूडेट’ दिसणाऱ्या सालेमची सुरुवातीच्या काळात बॉलीवूडमधील अनेकांशी मैत्री झाली. लहानपणापासून सिनेमाजगताबद्दलचं आकर्षण हे त्याचं मुख्य कारण होतं. पण नंतर या मैत्रीचा वापर करून सालेमने चित्रपटसृष्टीतून बक्कळ पैसा कमवण्यास सुरुवात केली. बॉलीवूडमधील एक अभिनेत्री चित्रपट दिग्दर्शक, निर्माते यांच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवून असायची. त्यानुसार सालेम व त्याचे गुंड या दिग्दर्शक/निर्मात्यांना धमक्या देऊन खंडणी उकळायचे. अशा अनेक छोटय़ा छोटय़ा पण महत्त्वाच्या गोष्टी झैदी यांनी पुस्तकातून मांडल्या आहेत. अभिनेता संजय दत्त याच्यासोबतची सालेमची मैत्री यावर पुस्तकात एक प्रकरणच आहे. संजय आणि सालेम यांच्या ‘मैत्री’चे तपशील मांडताना आजवर उजेडात न आलेले काही किस्सेही यानिमित्ताने झैदी यांनी उघड केले आहेत. मोनिका बेदी हे सालेमच्या आयुष्यातले मोठे प्रकरण होते. मोनिका बेदीचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेश, मुकेश दुग्गल या अंडरवर्ल्डशी जवळीक असलेल्या दिग्दर्शकाचा तिच्यावरील वरदहस्त, तिचे बॉक्स ऑफिसवर ढासळते चित्रपट यावर एक अख्खे प्रकरण पुस्तकात आहे. मोनिकाच्या या अपयशाच्या काळात तिची सालेमशी ओळख झाली. त्या वेळी सालेमने आपले नाव ‘अर्सलन अली’ असे सांगितले होते, असे मोनिकाचे म्हणणे आहे. पण सालेमचा तिच्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर या दोघांच्या नशिबाला कलाटणी मिळाली. सालेमच्या ‘विनंती’मुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी मोनिकाला आपल्या चित्रपटांत भूमिका दिल्याचे काही किस्से लेखकाने मांडले आहेत. सालेमच्या भीतीने दिग्दर्शक राजीव राय यांनी चित्रपटसृष्टीतूनच कसा काढता पाय घेतला, याचेही वर्णन करण्यात आले आहे. ‘जोडी नंबर वन’ या चित्रपटात मोनिकाचा नायक असलेल्या संजय दत्तला चित्रपटाच्या प्रसंगादरम्यानही तिला घट्ट न पकडण्याचा इशारा कसा मिळाला होता, याचाही तपशील झैदी यांनी दिला आहे. मोनिका या विषयावर पुस्तकात चार प्रकरणे आहेत, हे विशेष! सालेमला स्त्रियांबद्दल असणारे आकर्षण, समिरा जुमानी हिच्यासोबतचा प्रेमविवाह, त्याआधी घरच्यांनी बळजबरीने गावातील मुलीशी करून दिलेले लग्न, बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींशी असलेले संबंध याचा पुस्तकात वेळोवेळी उल्लेख आला आहे.
उत्तर प्रदेशातून मुंबईत आल्यानंतर सालेमने आपल्या भावाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तेथे त्याची ओळख दाऊदचा भाऊ अनिस याच्या एका सहकाऱ्याशी झाली. तेथूनच सालेमचा ‘डी’ कंपनीत प्रवेश झाला. खंडणी, धमक्या, हत्या, हल्ले अशा कारवायांतून ‘डी’ कंपनीला भरपूर कमाई करून देत अल्पावधीतच सालेमने अनिस आणि दाऊदचा विश्वास संपादन केला. १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतही त्याचा सहभाग होताच. कालांतराने त्याने अनिसशी फारकत घेतली आणि स्वत:ची टोळी चालवण्यास सुरुवात केली. हा सर्व काळ ‘माय नेम इज अबू सालेम’मध्ये आला आहेच; पण त्याचबरोबर सालेमची पोर्तुगालमधील अटक, भारतात प्रत्यार्पण, मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील त्याचा मुक्काम, तळोजा कारागृहात त्याच्यावर झालेला हल्ला या घटनांचाही अतिशय सखोल तपशील झैदी यांनी पुरवला आहे. अबू सालेम सध्या तुरुंगात असून त्याच्यावर खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे हे पुस्तक कोणत्याही शेवटाविना संपते. मात्र, सालेमचे भवितव्य काय असेल, याचाही अंदाज झैदी आपल्या लिखाणातून देतात. पुस्तकाच्या कामासाठीच न्यायालयाच्या मधल्या सुटीत एकदा झैदी यांनी सालेमची भेट घेतली. तेव्हा आपण तुरुंगातून सुटून राजकारणात प्रवेश करू, असे सालेमने त्यांना म्हटले. ‘आझमगढमध्ये मी कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो, तरी निवडून येईन,’ हे सालेमचे वाक्य आपल्या देशातील राजकीय व्यवस्थेच्या अवस्थेवर भाष्य करणारे आहे. ‘माय नेम इज अबू सालेम’ हे अबू सालेम याच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या आयुष्याची गोष्ट आहे. झैदी यांनी याआधी ‘डोंगरी टू दुबई’ आणि ‘भायखला टू बँकॉक’ अशी मुंबईतील अंडरवर्ल्डवर दोन पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांमध्ये दाऊद, गवळी, अमर नाईक, छोटा राजन यांची एकत्रित कहाणी होती. मात्र, ‘माय नेम इज अबू सालेम’ हे केवळ नि केवळ सालेमची कर्मकहाणी आहे. यात अनेक तपशील, माहिती, गौप्यस्फोट आहेत. मात्र, झैदी यांनी त्याची मांडणी गोष्टरूपाने केल्यामुळे पुस्तकाची रंजकता अधिक वाढते.
‘अंडरवर्ल्ड’ला मुंबईच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ६० ते ९० या दशकांतील मुंबईच्या प्रवासाचे वर्णन अंडरवर्ल्डच्या उल्लेखाशिवाय पुढे सरकणारच नाही. त्यामुळे हा इतिहास आपल्याला नक्की माहिती हवा. आता तो अधिक रंजकपणे वाचावा, असे वाटत असेल तर झैदी यांच्या आधीच्या दोन पुस्तकांप्रमाणे ‘माय नेम इज अबू सालेम’ हे पुस्तक एक चांगले उत्तर ठरू शकेल.
माय नेम इज अबू सालेम
एस. हुसेन झैदी ‘पेंग्विन बुक्स इंडिया
किंमत २९९ रुपये ‘पृष्ठे २४८

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - January 31, 2015 at 5:00 pm

Categories: Marathi   Tags: ,

© 2010 PupuTupu.in