Posts Tagged ‘Scope of career in Car Designing’

Scope of career in Car Designing

कार डिझायनिंगमधील स्कोप – Scope of career in Car Designing

माझा मुलगा बारावी सायन्सला आहे. त्याला कार डिझाइयनिंगमध्ये रस आहे. त्यासाठी कोणते अभ्यासक्रम आहेत? इंजिनीअरिंग करून त्यात जाण्याचा मार्ग आहे काय? याचे पुण्यात कोणते कोर्सेस आहेत? या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे? कृपया माहिती द्यावी.

कार, बाइक या मुलांच्या आवडीच्याच नव्हे, तर त्यांना वेडे करून सोडण्याच्याच गोष्टी असतात. अर्थात, तुमच्या मुलाप्रमाणेच या रस्त्याला जाण्याचा ध्यास घेणारे आजवर अनेक विद्यार्थी मला भेटलेही आहेत. म्हणून यातील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर येथे देत आहे.

डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन आणि कार डिझाइन असा हा खडतर रस्ता आहे. डिझाइनचे भारतात उत्तम कोर्सेस आहेतच. एनआयडी, सृष्टी ही त्यातील संस्थांची पुण्याबाहेरची नावे. डीएसके सुपइन्फोकॉम, सिम्बायोसिस, एमआयटी, व्हीआयटी आदी पुण्यातील संस्था आहेत, जेथे डिझाइनचा कोर्स आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आयआयटीत सोय आहे. आर्किटेक्ट, डिझाइनर, इंजिनीअर्स आणि बीएफए झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या प्रवेश परीक्षेला बसता येते. जागा फक्त २० असतात. हे सर्वच कोर्स बऱ्यापैकी खर्चिक असतात. साधारण चार लाख ते सात लाख रुपयांपर्यंत एकूण खर्च येतो.

यात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे, या प्रश्नाची विविध उत्तरे आहेत. उत्तम डिझायनरला भारतात प्रचंड मागणी व स्कोप आहे; पण केवळ कार डिझाइनरला किती मागणी आहे, याबाबत नक्की उत्तर नाही. आजही पूर्णतः भारतीय कार म्हणून केवळ ‘नॅनो’चा उल्लेख होतो. बाकीमध्ये सहकार्य तत्त्वावर (असेम्ब्ली) काम चालते. त्यामुळे त्याबाबत फार खोल विचार करायचीसुद्धा गरज नाही, हे आपल्या नक्की लक्षात येईल. मुलांना पटणे मात्र कठीण जाते.

जगभराची स्थिती काय आहे, याचा जाता जाता उल्लेख फार महत्त्वाचा ठरतो. सर्व महत्त्वाच्या कार निर्मात्यांच्या डिझायनर यादीत इटालियन नावांचे प्राबल्य आहे. जसे एक्स्ट्रा लार्ज कार म्हणजे अमेरिकन, छोटी उपयुक्त कार म्हणजे जपानी किंवा कोरियन आणि महागडी; पण अत्यंत सुरक्षित आणि अल्टिमेट मशीन म्हणजे जर्मन कार; तसेच कार डिझायनिंग म्हणजे वर्चस्व इटालियन्सचे.

एक भारतीय म्हणून यात फरक पडावा, अशी जरी इच्छा असली, तरी शक्यता खूप कमी दिसते, हेही तितकेच खरे आहे. ‘नॅनो’चा डिझायनर मात्र अस्सल महाराष्ट्रायीन आहे, हे नक्की!

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 17, 2013 at 4:53 am

Categories: Jobs   Tags:

© 2010 PupuTupu.in