Astronomy Study

करा अंतराळाचा अभ्यास – Astronomy Study

करिअर घडवण्यासाठी ज्योतिषातल्या ग्रह ताऱ्यांचा कितपत उपयोग होतो, हे माहीत नाही. पण तुम्हाला अवकाशाच्या अभ्यासात रस असेल तर, याच ग्रहगोलांच्या संशोधन विषयात तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ ही आशिया खंडातील तसंच जगातील अंतराळविषयीची पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध असणारी पहिली संस्था आहे. या अभ्यासक्रमांचा भर हा अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोजन यावरच आहे. या संस्थेची स्थापना २००७ साली झाली. वर्षभराच्या कालावधीतच या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. केंद्र सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून आय.आय.एस.टी. कार्य करते. या संस्थेचं उद्दिष्ट देशभरात विज्ञान शाखेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून अवकाश क्षेत्रातील उपक्रमावर भारताचा ठसा उमटवणं हे आहे. अंतराळ संशोधन या विषयाची व्याप्तीही मोठी आहे. या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत माहिती घेऊ या.

पदवी अभ्यासक्रम

बी.टेक. (एव्हिऑनिक्स)

एव्हिऑनिक म्हणजे एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याबरोबरीने एव्हिएशन क्षेत्रातील या शाखांच्या उपयोजितेबाबत प्रशिक्षणही समाविष्ट असतं. उदा. एरोस्पेस व्हेईकल व उपग्रह व्यवस्थेतील नियंत्रण प्रणाली, त्यांची रचना व निर्मिती, सॅटेलाइट कम्युनिकेशन, इन्फर्मेशन थिअरी व कोडिंग, मोबाइल कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह, इंटिग्रेटेड सर्किटस्, अँटेना इंजिनीअरिंग अशा विविध विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात होतो.

बी.टेक. (एरोस्पेस इंजिनीअरिंग)

एरोस्पेस इंजिनीअरिंग हे रॉकेट सायन्स या शाखेशी साधर्म्य असणारं आहे. मेकॅनिकल इंजिनीअरिंगशी संबंधित अभ्यासाचा पायाभूत अभ्यासक्रमात समावेश असतो. उदा. सॉलिड व फ्लुइड मेकॅनिक्स, थर्मोडायनॅमिक्स, ह‌िट ट्रान्सफर, मटेरियल सायन्स इ. या पायाभूत अभ्यासानंतर त्याचं उपयोजन असणारे एरोडायनॅमिक्स, गॅस डायनॅमिक्स, प्रोपल्शन, फ्लाइट मेकॅनिक्स, थिअरी ऑफ मशिन्स, एरोस्पेस स्ट्रक्चर्स इत्यादी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी लॉन्च व्हेईकल तसंच विमानं व अवकाशयान यांची रचना व निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची एरोस्पेस उद्योगक्षेत्रातली आव्हानं पेलण्यासाठी उत्तम तयारी पूर्ण होते. एरोडायनॅमिक्स डिझाइन, प्रॉपल्शन सिस्टीम, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रांत काम करण्यासाठी त्यांची पूर्ण तयारी झालेली असते. ‘इस्रो’ या भारतातील अग्रगण्य व जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेतील विविध प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. या अनुभवानंतर त्यांना एरोस्पेस सबसिस्टीम व अन्य संबंधित क्षेत्रांत संशोधन करणा-या संघांचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.

बी.टेक. (फिजिकल सायन्स)

अंतरिक्ष मोहिमा या विशिष्ट वैज्ञानिक हेतू व उद्दिष्टे समोर ठेवून आखलेल्या असतात. त्यामुळे वरील अभ्यासक्रमाची रचना अंतराळ संशोधनाची आवश्यकता लक्षात घेऊन केलेली आहे. यात अॅस्ट्रोनॉमी- अॅस्ट्रोफिजिक्स, रिमोट सेन्सिंग, अर्थ सिस्टीम सायन्स व केमिकल सिस्टीम यांचा अंतर्भाव केलेला आहे. या चारपैकी एका विभागातून पाच विषयांची विद्यार्थ्यांना निवड करायची असते. अॅस्ट्रोनॉमी व अॅस्ट्रोफिजिक्स या शाखेत विश्वउत्पत्तीशास्त्र, विश्वातील विविध आकाशगंगा, सौरमालिका, आकाशगंगेबाहेरील विश्व यांचा अभ्यास केला जातो. भौतिकीय शास्त्रांमधील मूलभूत संकल्पना वापरत ताऱ्यांमधील अंतरं मोजणं, अंतरिक्ष मोहिमांच्या आखणीसाठी मूलभूत माहिती संकलित करणं, अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीच्या शक्यतेचा वेध घेणं या सर्वांचा समावेश या अभ्यासात होतो.

पृथ्वीवरील जमीन, वनं, पाणी, खनिजं इत्यादी नैसर्गिक संसाधनं, हवामान आदींचा उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीचं संकलन व आकलनाद्वारे अभ्यास करणं हे रिमोट सेन्सिंगचं महत्त्वपूर्ण कार्य असतं. उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीच्या आधारे नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर, संवर्धन शक्य होतं. तसंच भूकंप, त्सुनामी, वादळं अशा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळून संभाव्य नुकसान कमी करता येते.

‘अर्थ (Earth) सिस्टीम सायन्स’मध्ये पृथ्वीचे विविध स्तर, त्यांची वैशिष्ट्यं यांचा अभ्यास केला जातो. यात भौगोलिक संरचनांचा अभ्यास, खनिजशास्त्र (सॉलिड अर्थसायन्स) तसंच उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नैसर्गिक आपत्तींबाबत शास्त्रीय अंदाज वर्तवणं, हवामानातील बदलांचा व त्याच्या परिणामांचा अभ्यास, पर्जन्य, वारे, ऊर्जाउत्सर्जन इत्यादींचा अभ्यास (अॅटमॉस्फिअरिफ सायन्सेस) अशा बहुविध विषयांचा अभ्यास केला जातो.

केमिकल सिस्टीम अभ्यासशाखेत उपग्रह, त्यांना अवकाशात नेणा-या यंत्रणेसाठी आवश्यक इंधनं आणि घटक पदार्थाचा अभ्यास यांचा समावेश होतो. या पदार्थाची गुणवत्ता उंचावत अत्यंत कार्यक्षम घटकांची निर्मिती व त्यासाठी संशोधन यावर या अभ्यासक्रमाचा भर आहे. नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक संशोधनाशी संयोग साधत केमिकल सिस्टीम्सचा आकार लहान होऊन कार्यक्षमता कित्येक पट वाढवता येऊ शकते का, यावरही या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे.

पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया

आय.आय.एस.टी.मधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यावर्षीपासून जेईई(मुख्य) प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. या प्रवेशपरीक्षेबाबत अधिक माहिती http://www.jeemain.nic.in या वेबसाईटवरुन घ्यावी.

अभ्यासक्रमांना प्रवेश देताना जेईई(मुख्य) परीक्षेच्या गुणांना ६० टक्के वेटेज असेल तर बारावीच्या गुणांना ४० टक्के वेटेज असेल.

जेईई(मुख्य) परीक्षेनंतरचे विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष संस्थेकडून ठरवण्यात येतात. त्यासाठी संस्थेची वेबसाईट पहावी.

शिक्षणाचा सर्व खर्च (निवास व खाणं वगैरे) भागवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना असिस्टंटशिपची सुविधा दिली जाते.

पदव्युत्तर अभ्यासक्रम

संस्थेमध्ये इस्त्रोच्या प्रोजेक्ट्सशी सुसंगत विविध विषयातील एम.टेकचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

> एम.टेक. इन सॉफ्टकॉम्प्युटिंग अॅण्ड मशीन लर्निंग

> एम.टेक. इन रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅण्ड मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन

> एम.टेक. इन ऑप्टिकल इंजिनिअरिंग

> एम.टेक. इन केमिकल सिस्टीम्स

> एम.टेक इन प्रोप्लशन

> एम.टेक इन डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग

> एम.टेक इन एरोडायनॅमिक्स अॅण्ड फ्लाईट मेकॅनिक्स

> एम.टेक इन स्ट्रक्चर्स

> एम.टेक इन अर्थ सिस्टीम सायन्स

> एम.टेक इन जिओइन्फोर्मेटिक्स

> एम.टेक इन कंट्रोल सिस्टीम्स

> एम.एस. इन अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स

> एम.टेक इन मशिन लर्निंग अॅण्ड कॉम्प्युटिंग

> एम.टेक इन सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजी

> एम.टेक इन व्ही.एल.एस.आय. अॅण्ड मायक्रोसिस्टीम्स

> एम.टेक इन मटेरियल्स सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंगचे पदवीधर(बी.ई./बी.टेक) किंवा बेसिक सायन्समधील पदव्युत्तरपर्यंतचे (एम.एस्सी./एम.एस.) शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र असतात. या परीक्षेमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रवेशाकरिता लेखी परीक्षा/ मुलाखत घेतली जाते. मे महिन्यात अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जाहिरात प्रकाशित केली जाते.

डॉक्टरेट अभ्यासक्रम

एरोस्पेस इंजिनीअरिंग, एव्हिऑनिक्स, रसायनशास्त्र, मानव्यशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी लेखी परीक्षा व मुलाखत द्यावी लागते. पीएच.डी.साठी इंजिनीअरिंगमधून मास्टर्स (पदव्युत्तर शिक्षण) केलेले विद्यार्थी पात्र ठरतात, परंतु पदवी अभियांत्रिकीमधील कुशाग्र बुद्धिमत्ताधारक विद्यार्थ्यांचाही चांगल्या शैक्षणिक कामगिरीवर व संशोधनातील कलाप्रमाणे पीएच.डी.साठी विचार केला जाऊ शकतो. मूलभूत विज्ञान आणि मानव्यशास्त्रामधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचादेखील पीएच.डी.साठी विचार केला जाऊ शकतो, पण त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेत (जेआरएफ) उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा – वय २८ वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे.

अधिक माहितीसाठी संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तिरुअनंतपुरम, केरळ,. www.iist.ac.in